अंबरनाथ : निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरल्यानेच अंबरनाथला उद्यानाची संरक्षक भिंत कोसळून दोन जणांना प्राण गमवावे लागले आहेत. या प्रकरणाची नगरपालिका प्रशासनाने सखोल चौकशी करून संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार रवींद्र चव्हाण यांनी आज अंबरनाथला केली.
बुधवारी (6) रोजी रात्री अंबरनाथला झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्वेकडील महालक्ष्मीनगर परिसरात रात्री उद्यानाची संरक्षक भिंत कोसळली. त्यावेळी रस्त्यावरून पायी जाणाऱ्या गोविंद केसळकर(38) आणि प्रवीण कदम (30) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. रात्री उशिरापर्यंत दुर्घटनास्थळी मदतकार्य सुरू होते. या घटनेत काही घरांचे आणि दुचाकी वाहनांचे नुकसान झाले होते. आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी बुधवारी रात्रीच घटनास्थळी जाऊन परिसराची पहाणी केली होती.
दोषींविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा-आ. रवींद्र चव्हाण
घटनेचे वृत्त समजताच आमदार रविंद्र चव्हाण यांनी आज गुरुवारी दुपारी भिंत कोसळून मरण पावलेल्या मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली आणि पाहणी केली. आमदार कुमार आयलानी, कल्याण जिल्हा भाजपा अध्यक्ष शशिकांत कांबळे, प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले-पाटील, भाजपा शहराध्यक्ष अभिजित करंजुले-पाटील, राजेश कौठाळे, जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. नायब तहसीलदार संभाजी शेलार, पालिका मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्याशीही आमदार चव्हाण यांनी चर्चा करून मदत कार्याची माहिती जाणून घेतली
उद्यानाची भिंत बांधणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून नगरपालिकेने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केल्याचे आमदार चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. घटनेत मृत्युमुखी पडल्याचे संसार उघड्यावर पडले असून मृतांच्या नातेवाईकांना शासकीय नियमानुसार तातडीचे चार लाख रुपयांची मदत करावी. नुकसान झालेल्या घरातील नागरिकांना नगरपालिकेने घरे बांधून द्यावीत आणि धान्य पुरवठा करावा, पालिकेत गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप आमदार चव्हाण यांनी केला. दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी भाजपाने जबाबदारी घेतल्याचा उल्लेख त्यांनी केला.
आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनीही दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. त्यांना तातडीने शासनातर्फे तातडीची आर्थिक मदत करण्यात यावी आणि भिंतीच्या बांधकामाला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना आमदार डॉ . किणीकर यांच्या कार्यालयात धान्यवाटप करण्यात आले. माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.
भिंत कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना शासकीय धोरणानुसार चार लाखांची मदत त्वरित मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत, त्याचबरोबर घटनेत घरांचे नुकसान झालेल्यांना ही मदत मिळावी यासाठी पंचनामे करून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवला जाईल, असे अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने यांनी सांगितले.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.