ठाणे : यंदाची ठामपा निवडणूक त्रिसदस्य प्रभाग पद्धतीने होणार असून आताच्या सत्ताधारी पक्षांच्या पथ्यावर पडणार असल्याचे बोलले जात आहे. २० वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने झालेल्या निवडणुकीत मात्र मातब्बर उमेदवारांना पराभूत व्हावे लागले होते. त्यावेळी महापालिकेत सेना-भाजपने सत्ता स्थापन केली होती. आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी आहे.
फेब्रुवारी २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या मुंबई, ठाण्यासह १८ प्रमुख महापालिकांची निवडणूक एक सदस्यीय पद्धतीने घेण्याचे राज्य निवडणूक आयोगाने २५ ऑगस्ट रोजी जाहिर केले होते. याचा सर्वाधिक फटका ठाण्यात शिवसेनेला बसण्याची शक्यता होती. २०१७ साली मोदी लाट जोरात असतानाही चार सदस्य प्रभाग पद्धतीमुळे शिवसेनेने ठाण्यात एकहाती सत्ता मिळवली होती. मात्र एक सदस्यीय निवडणूक झाल्यास शिवसेनेला निवडणूक अवघड जाणार असल्याने बहूसदस्यीय पद्धतीने निवडणूक घेण्यासाठी सत्ताधारी शिवसेना आग्रही होती. तर दोन सदस्यीय प्रभागासाठी राष्ट्रवादी आणि एक सदस्यसाठी काँग्रेस आग्रही होती. अखेर यावर तोडगा म्हणून भविष्यात महाविकास आघाडीचा पॅटर्न महापालिकांमध्येही राबवण्याच्या दृष्टीने तीन सदस्यीय प्रभागाचा तोडगा काढण्यात आला आहे.
ठाण्यात महाविकास आघाडीतील घटक पक्षांत उत्साह
तत्कालीने काँग्रेस आघाडी सरकारने २००२ साली तीन सदस्य पद्धतीने निवडणूक लागू केली होती. पण ही प्रभाग रचना त्यांच्याच अंगलट आली. त्यावेळी ठामपाच्या ११५ जागांपैकी शिवसेनेने सर्वाधिक ४९ जागा मिळवल्या होत्या. तर युती असल्याने मित्रपक्ष असलेल्या भाजपने १४ जागा मिळवल्या होत्या. त्यामुळे ६३ नगरसेवकांची फौज घेऊन शिवसेना- भाजप युतीने महापालिकेवर विजयाचा झेंडा फडकवला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादीने २४ तर काँग्रेसने १३ जागांवर विजय मिळवला होता. अपक्षांचीही यावेळी चलती होती. अपक्ष ७, सुधाकर चव्हाण यांच्या जनविकास आघाडीने तीन, रिपाइं एकतावादीने दोन, जनतादल आणि समाजवादी पक्षाच्या खात्यात प्रत्येकी एक जागा गेली होती.
मात्तबरांना बसला होता फटका
२००२ साली झालेल्या तीन सदस्यीय निवडणुकीत अनेक मात्तबरांना फटका बसला होता. राष्ट्रवादीच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडणूक लढवणाऱ्या प्रताप सरनाईक यांना २००२ साली शिवसेनेच्या उमेदवाराकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. याशिवाय काँग्रेसचे दिवंगत बाळकृष्ण पुर्णेकर, अशोक राऊळ, बी.बी.मोरे सध्या भाजपवासी झालेले व त्या काळी काँग्रेसकडून निवडणूक लढलेले नारायण पवार, मनोज प्रधान आदींना पराभव पत्करावा लागला होता. विशेष म्हणजे याच निवडणुकीत विद्यमान पालकमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे किसननगर प्रभागातून निवडून आले होते.
बदलते पॅनल
२००२- त्रिसदस्य पद्धत
२००७- एक सदस्य पद्धत
२०१२- दोन सदस्य पद्धत (५० टक्के महिला राखीव)
२०१७- चार सदस्य पद्धत
यंदा ३३ ऐवजी ४४ प्रभाग
२०१७ साली झालेल्या निवडणुकीत चार सदस्य प्रभागानुसार ३३ प्रभाग पाडण्यात आले. यामध्ये केवळ एका प्रभागात तीन सदस्य होते. आता २० वर्षांनंतर तीन सदस्य पद्धतीनुसार निवडणूक झाल्यास प्रभागांची संख्या ४४ होण्याची शक्यता आहे. त्यापैकी एका प्रभागात दोन सदस्य असतील.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.