ठाणे : ऐतिहासिक किल्ल्यांवर होणाऱ्या गैरप्रकारावर पुरातत्व विभाग व प्रशासन गप्प का? असा सवाल करून कारवाई झाली नाही तर सह्याद्री प्रतिष्ठान पुरातत्व खात्याला घेराव घालून संबंधित अधिकाऱ्यांना समस्त शिवभक्तांतर्फे जाब विचारणार असल्याचा इशारा सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी दिला. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे गणेश रघुवीर, ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेरकर, सागर पाटील हे उपस्थित होते.
गड-किल्ल्यांवर होणाऱ्या अशा या गैरप्रकारांबाबत शासनाने तातडीने कारवाई करून असे प्रकार रोखण्यात यावेत असे प्रश्न विधानसभेत विधिमंडळ अधिवेशनात मांडले होते व त्याला संबंधित मंत्र्यानी याबाबत सुरक्षारक्षक व कर्मचारी नेमले असून, किल्ल्यांवरील अतिक्रमणे, बांधकामे हटविण्याबाबत संबंधित खात्यास सूचना निर्गमित केल्याचे मला लेखी कळविले असल्याचे आ. केळकर यांनी निदर्शनास आणले. मात्र लेखी उत्तर देऊनही असे गैरप्रकार सुरू असल्याने शिवभक्तांमध्ये तीव्र संताप असल्याचेही त्यांचे सांगितले.
सह्याद्री प्रतिष्ठान पुरातत्व खात्याला घेराव घालणार-आमदार केळकर
महाराष्ट्राला गडकोटांचा वारसा लाभलेला आहे. स्थळदुर्ग, जलदुर्ग व गिरिदुर्ग असे सर्वसाधारण किल्ल्यांचे प्रकार हे आपल्याला पाहायला मिळतात. किल्ल्यांच्या ऐतिहासिक वास्तूंची आज जरी पडझड झाली असली तरी त्यांचे महत्व येत्या हजारोवर्षापर्यंत कमी होणारे नाही, परंतु शासनाच्या व पुरातत्व विभागाच्या दुर्लक्ष व अपुऱ्या निधीमुळे आज गडकिल्ल्यांवरील कामे वेळेवर व योग्य पद्धतीने होताना दिसत नाहीत. शासन समित्या स्थापन करणे आणि पुरातत्त्व विभाग अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत मनुष्यबळ नाही असे उत्तर देणे हे वर्षोनुवर्ष सुरु आहे. त्यातच पर्यटनाच्या दृष्टीने आराखडे तयार होतात, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. ते फक्त कागदोपत्री व वृत्तपत्रात बातमी पुरते मर्यादित राहतात असे आ. केळकर यांनी बोलताना सांगितले.
ऐतिहासिक किल्ल्यांची जर डागडुजी करता येत नसेल तर किमान त्याची होणारी विटंबना, गैरप्रकार हे तरी रोखण्यात यावे. कारण सध्या पालघर जिल्ह्यातील ता. वसई मध्ये असणारा वसई किल्ला हा मराठ्यांच्या ज्वलंत इतिहासाची साक्ष देणारा किल्ला आहे. इ. स.१५४० पासून किनारपट्टीवर आपला ताबा आणि वसई सारख्या किल्ल्यावर आपली राजवट टिकवून ठेवणारे पोर्तुगीजांचे उच्चाटन इ. स. १७३४ मध्ये चिमाजी अप्पा यांनी केले. त्याच विलक्षण विजयाची साक्ष असणारा हा वसई किल्ला आज विवाहपूर्व चित्रीकरणाचा जणू अड्डाच झाला आहे. तर महिलांसोबत गैरवर्तन, मद्यपान व धुम्रपान अशा घटना येथे सातत्याने होत असतात. हा किल्ला केंद्र पुरातत्व विभाग मुंबई सर्कल, अधीक्षक राजेंद्र यादव यांच्या अंतर्गत येत असून इथे फक्त तीन पहारेकरी नेमले आहेत. तेही पर्यटक आणि शुटींग करण्याऱ्याकडून पैसे घेऊन किल्ल्यातील चर्च, तटबंदी बुरुज आणि मंदिरे इथे चित्रीकरण करायला परवानगी देतात. सद्य स्थितीत किल्ल्यात मोठ्या प्रमाणात जंगल वाढलेले असून ते स्वच्छ करण्यासाठी पुरेसे कामगार नाहीत. तर संवर्धन करणाऱ्या संस्थाना स्वच्छतेची परवानगी देण्यात येत नाही. तसेच स्थानिक पोलिसांची पेट्रोलिंग वाढावी यासाठी वांरवार पत्रे देण्यात आलेली असून शनिवार आणि रविवार किल्ल्यात असे प्रकार सतत सुरु आहेत.
रायगड जिल्ह्यातील रेवदंडा उर्फ अगरकोट आणि कोर्लई किल्ला,हे दोन्ही किल्ले केंद्र पुरातत्व विभाग अंतर्गत असून हे हि किल्ले या चित्रीकरणाच्या बाबतीत मागे राहत नाहीत. इथेही कामगार पैसे घेऊन हे प्रकार करायला देतात ही बाब गंभीर असल्याचे आ. केळकर यांनी बोलताना सांगितले.
स्थानिक पोलीस प्रशासन आणि झोपलेले केंद्र पुरातत्व विभाग कोणती कारवाई करते याकडे शिवप्रेमींचे लक्ष लागले आहे असे संस्थेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेरकर यांनी सांगितले तर संस्थेचे गणेश रघुवीर व सागर पाटील हे वसई किल्ला फिरत असताना अशा अत्यंत गंभीर गोष्टी निदर्शनास येत असल्याची त्यांनी खंत व्यक्त केली.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.