कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवहार ठप्प असून यामुळे अनेक उद्योग धंद्यांना याचा फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे नाट्यगृह देखील बंद असल्याने नाटकामध्ये काम करणारे कलावंत आणि इतर कलाकार यांच्यावर काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे नाटकांच्या प्रयोगांना परवानगी देण्याची मागणी कलावंतानी मुख्यमंत्र्यांकडे केली असून ५० लोकांसाठी छोटे प्रयोग राबविण्याची संकल्पना देखील त्यांनी मांडली आहे. या कलावंतांमध्ये अभिजित झुंजारराव (कल्याण), अतुल पेठे (पुणे), शंभू पाटील (जळगाव), वामन पंडित (कणकवली), दत्ता पाटील (नाशिक), अनिल कोष्टी (भुसावळ) आणि इतर अनेक गावांतील रंगकर्मी यांचा समावेश आहे.
सारे जग गेले दीड वर्ष अतिशय संकटातून जात आहे. विविध क्षेत्रांसमोर जीवघेणे प्रश्न कोविडने उभे केले आहेत. कोविडची स्थिती नक्की आणि पक्की कोणालाच वर्तवता येत नसल्याने सरकार आपल्या परीने जबाबदार पावले टाकत आहे. शिक्षण या अतिशय महत्वाच्या गोष्टीला अजून कुलूप आहे. हे सर्व सुरळीत सुरू झाल्यावर मग करमणूक या नावाखाली जे काही क्षेत्र येते ते सुरू होणार याबाबत कलावंत सहमत आहेत. आधीपेक्षा आता परीस्थितीमध्ये थोडीफार सुधारणा होत असून लसीकरण त्यात मोलाची भर घालत आहे.
कोविडच्या संकटाने आर्थिक प्रश्न जसे निर्माण केले तसे मानसिक प्रश्न गंभीर केलेले आहेत. त्याकरता समुपदेशन आणि मार्गदर्शन काही डॉक्टर्स करत आहेत. आपल्यावरील हे असह्य ताण दूर होण्याचा एक मार्ग नाटक ही जिवंत कला पाहाणे हाही आहे. पहिली लाट ओसरल्यावर मराठी रंगभूमीवर काही लोकांनी सर्व काळजी घेऊन नाट्यप्रयोग केले. प्रायोगिक रंगभूमीवर केवळ २५/३० लोकांसमोर काही कलावंतानी अतिशय सुरक्षित आणि यशस्वीरीत्या प्रयोग केले. सभा, समारंभ, मंडई, हॉटेल अशा जागांपेक्षा ‘थिएटर’ ही अधिक सुरक्षित जागा आहे. याचा कलावंतानी अनुभव घेतला आहे.
त्यामुळे निदान ५० लोकांकरता छोट्या स्वरूपातील प्रयोग करायला सरकारने परवानगी देण्यात यावी जेणे करून यामुळे समाजात मनस्वास्थ्य टिकायला मदत होईल अशी मागणी नाटक कलावंतांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. करोनाविरुद्धच्या या संकटात कलावंतांची साथ होतीच आणि पुढेही असेल अशी हमी देखील या कलावंतानी मुख्यमंत्र्यांना दिली आहे.