यापुढे कुठलीही कारवाई करताना पोलीस कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी वर्दीमध्ये राहणे बंधनकारक असून, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आता तशा सूचनाही दिल्या आहेत. विना वर्दी लोकांवर कुठलीही कारवाई करू नका, असे पोलीस आयुक्तांनी बजावले आहे. एवढेच नाही तर हा निर्णय वाहतूक पोलिसांना देखील लागू असेल. वाहतूक पोलिसांनाही विना वर्दीमध्ये आता गाड्यासुद्धा अडवता येऊ शकणार नाहीत.
पोलिसांची वर्दीमध्ये कारवाई
काही भागांत पोलीस साध्या वेशामध्ये कारवाई करताना आढळत आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी या सूचना दिल्या. विनावर्दी कारवाई करतानाचा फायदा अधिकारी घेऊ शकतात. त्या कारणांमुळे पोलिसांना आता वर्दीमध्ये राहूनच जी कोणतीही असेल ती कारवाई करा, अशा थेट सूचना हेमंत नगराळे यांनी दिल्या.
कोणत्याही विभागामध्ये विशेष पथक नसेल
मार्च २०२१ मध्ये मुंबई पोलीस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी पोलीस दलासंदर्भात वेगवेगळे निर्णय घेतले. परमबीर सिंगांच्या जागी नियुक्त झालेल्या पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंनी आपला पहिला निर्णय विशेष पथकाच्या पुनर्रचनेचा घेतले होते. यापुढे मुंबई पोलीस दलामध्ये कोणत्याही विभागामध्ये विशेष पथक नसेल, हा निर्णय मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घेतला होता.
वर्दीमध्ये राहूनच जी काही असेल ती कारवाई करावी लागणार आहे
कायदा व सुव्यवस्था दल, क्राईम पथक, आर्थिक गुन्हे शाखा, प्रशासन, ट्राफिक या मुंबई पोलीस दलातील पाच विभागांमधील पोलिसांना आता वर्दीमध्ये राहूनच जी काही असेल ती कारवाई करावी लागणार आहे. यापैकी कायदा व सुव्यवस्था, क्राईम व आर्थिक गुन्हे शाखा या ३ विभागांमध्ये तपासाच्या अनुषंगाने वेगवेगळी पथक, सेल निर्माण केली जात असतात. परंतु आता असा कोणताही प्रकार होणार नाही. कोणतेही विशेष पथक चालू न ठेवण्याचा अथवा न बनवण्याचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घेतला आहे.
१९ महिन्यांचा कार्यकाळात शिल्लक
हेमंत नगराळे हे १९८७ साली आयपीएस अधिकारी आहेत. हेमंत नगराळे यांचा १९ महिन्यांचा कार्यकाळात शिल्लक आहे. हेमंत नगराळे यांनी २०१६ साली नवी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला होता. त्यानंतर २०१८सालामध्ये त्यांची नागपुरामध्ये बदली झाली. नगराळे यापूर्वी पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते. तर मार्च २०२१ मध्ये परमबीर सिंग यांची उचलबांगडी करून हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तपदाचा पदभार देण्यात आला.
Credits and. Copyrights – May Marathi