औरंगाबाद : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकावर टीकास्त्र सोडले. यावेळी, भाषण करताना पंकजा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. नरेंद्र मोदींनीं देशातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या समाजाला 10 टक्के आरक्षण देऊ केलं, असे पंकजा यांनी सांगितलं. तर, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन बोलताना फडणवीस यांनीच ते महाराष्ट्राला दिल्याचं पंकजा यांनी म्हटलं. तसेच, राज्य सरकारने पोटनिवडणुकांच्या अगोदरच हा अध्यादेश का काढला नाही?, असा सवालही विचारला.
भाजपच्या ओबीसी जागर अभियानांतर्गत औरंगाबादमध्ये भाजपच्या ओबीसी मोर्चाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात बोलताना पंकजा यांनी मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिल्याचं सांगितलं. आता एक नवीनच षड्यंत्र सुरू झालंय. बहुजनाची व्याख्या खराब करण्याचं हे षड्यंत्र आहे. इकडे ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उचलला की, तिकडे कोणीतरी षड्यंत्रकारी लोक मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा काढतात. अरे मराठा समाजाच्या पाठीवर खंजीर खुपसण्याचं कामही तुम्हीच केलंय.
मराठा समाजाला आरक्षण ज्या मुख्यंत्र्यांची तुम्ही दररोज जात काढत होतात, त्याच मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलंय, असे पंकजा यांनी म्हटले. मराठा समाजाला आरक्षण दिलं, त्या मराठा समाजाचं आरक्षण आज संपुष्टात आलं. ओसीबी समाजाचं आरक्षण बचाव करण्याचा प्रयत्न आम्ही करत केला, ते आरक्षण आज संपुष्टात आलं. महाराष्ट्रात आज राजकीय भविष्य काय, येणाऱ्या निवडणुकांमध्ये ओसीबी समाजाच्या डोक्यावर टांगती तलवार देण्याचं काम सरकारने केलंय, असे म्हणत पंकजा यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.
तसेच, सरकारने काढलेला ओबीसी समाजाच्या राजकीय अध्यादेश टिकला पाहिजे, सरकारने आगामी निवडणुकांसाठी तो टिकवून दाखवावा, तसं झाल्यास आम्ही सरकारचं कौतुक करू. पण, ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं नाही, तर रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशाराच पंकजा यांनी दिला आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.