गेल्या काही महिन्यांपासून राज्यावर सातत्याने संकटं येत आहेत. अतिवृष्टी, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तींचा सामना राज्य करत आहे. दरवर्षी राज्यामध्ये पूर येत असल्याने कोट्यवधींचे नुकसान होत आहे. राज्याची राजधानी मुंबई सातत्याने नैसर्गिक संकटांसोबत दोनहात करत आहे. अतिवृष्टी, पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे वारंवार मुंबईची तुंबई होत असताना आपण पाहत आहोत. आता याच पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केलेल्या भविष्यवाणीने चिंता अधिकच वाढली आहे.
लोकांना वेळीच जाग आली नाही, तर..
नरिमन पॉईंट, कफ परेड, मंत्रालय २०५० पर्यंत समुद्राच्या पाण्याखाली जातील, असा धोक्याचा इशारा आता चहल यांनी दिला आहे. वातावरणामध्ये बदल होत असून, तापमानात वाढ होत आहे. त्याचे परिणाम आतापासूनच दिसू लागले असल्याचे निरीक्षण चहल यांनी नोंदवले. निसर्ग आपल्याला वेळोवेळी इशारे देत आहे, परंतु आपण त्याकडे अनेक वेळा दुर्लक्ष करतो. लोकांना वेळीच जाग आली नाही, तर परिस्थिती अतिशय धोकादायक बनेल, असा इशारा चहल यांनी दिला. मुंबई महापालिकेच्या एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
हवामानातील बदलांमुळेच पाण्याखाली जाईल
मुंबई शहरामधील ए, बी, सी व डी वॉर्डांमधील ७०% भाग हवामानातील बदलांमुळेच पाण्याखाली जाईल. त्यामुळे कफ परेड, नरिमन पॉईंट व मंत्रालय यांसारखा परिसर जलमय होईल, अशी भविष्यवाणी चहल यांनी केली आहे. कफ परेड, नरिमन पॉईंट व मंत्रालयसारखा परिसर लवकरच पाण्याखाली जाईल. आपल्या हाती फारसा कालावधी उरला नाही, कारण हे सगळं पंचवीस ते तीस वर्षांतच घडेल. २०५० फार दूर नाही, असेही चहल म्हणाले.
गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या घटनांचा संदर्भ लावत चहल म्हणाले
मुंबईत गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या घटनांचा संदर्भ चहल यांनी दिला. गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला. १२९ वर्षांमध्ये प्रथमच मुंबईत चक्रीवादळ आले. त्यानंतरही पंधरा महिन्यांत तीन चक्रीवादळे येऊन गेल्याचे चहल यांनी सांगितले. ५ ऑगस्ट २०२० रोजी नरिमन पॉईंट परिसरात पाच ते ५.५ फूट पाणी साचले होते. त्या दिवशी चक्रीवादळ येईल, असा कोणताही धोक्याचा इशारा देण्यात आला नव्हता. परंतु निकष पाहिल्यास परिस्थितीत चक्रीवादळासारखीच होती, असेही चहल म्हणाले.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.