पुणे : विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीतून राजू शेट्टी यांचं नाव वगळल्याची चर्चा जोरात सुरु आहे. त्याबाबत राजू शेट्टी यांनीही आक्रमक भूमिका मांडली आहे. या बाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपालांना देण्यात आलेल्या यादीत राजू शेट्टी यांचं नाव आहे. आता राज्यपालांनी त्यावर अंतिम निर्णय घ्यायचा आहे, असं शरद पवार म्हणाले. ते आज पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी शेट्टींबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे.
“ते नाराज असतील त्याबाबत मला काही म्हणायचं नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जी यादी माननीय राज्यपालांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्यावतीनं दिलेली आहे. त्यात राजू शेट्टी यांनी सहकार आणि शेतीच्या क्षेत्रात जे योगदान दिलं आहे ते लक्षात घेऊन त्यांना विधान परिषदेवर घ्यावं, असा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्यपालांकडून आलेला नाही. एकदा आम्ही निर्णय घेतल्यानंतर याबाबतची अंतिम भूमिका ही राज्यपालांना घ्यायची असताना मला आश्चर्य वाटतं की अशाप्रकारची विधान कशी केली जातात. आम्ही आमचं काम प्रामाणिकपणाने केलं आहे. राजू शेट्टींनी काय वक्तव्य केलं मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही. मी दिलेला शब्द पाळला आहे. आता राज्यपाल काय करतात याची आम्ही वाट पाहतोय’, असं शरद पवार म्हणाले.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.