मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट-क आणि गट-ड साठी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. लेखी परीक्षा घेण्याचे काम न्यासा या संस्थेला देण्यात आले होते. त्या संस्थेने पूर्वतयारीसाठी आणखी वेळ हवा आहे, असे म्हणत ऐनवेळी परीक्षा घेण्यास नकार दिला. त्यामुळे शनिवार आणि रविवारी होणाऱ्या परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, राज्य सरकारच्या या घोषणेमुळे परीक्षार्थींकडून तीव्र संताप व्यक्त झाला आहे. त्यानंतर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आरोग्य विभागाच्या गट क व ड प्रवर्गातील या परीक्षा घेण्याबाबत संबंधित कंपनीने अमसर्थता दर्शवल्याने पर्याय नव्हता. कंपनीने 8 दिवसांचा कालावधी मागितला होता. त्यामुळे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी रात्री उशिरा चर्चा झाल्यानंतरच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण राजेश टोपे यांनी दिले.
परीक्षा 100 टक्के होणारचं, परीक्षा रद्द झाली नसून ती पोस्टपोन करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना जो मानसिक त्रास झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केली आहे. वास्तविक परीक्षांचा थेट संबंध आरोग्य विभागाशी नाही. आयटी विभागाने निवड केलेल्या कंपनीच्या अधिपत्याखालील हा विषय आहे. पण, आमच्या विभागातील नोकरीचा विषय असल्याने उद्या बैठक घेऊन आम्ही परीक्षेची तारीख निश्चित करू, असे राजेश टोपेंनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. माहिती व तंत्रज्ञान विभागाचा हा विषय आहे, कोणत्या कंपनीची निवड करायची हे तेच ठरवतात. त्यांनी निवड केलेल्या कंपन्यांचा हा विषय आहे, आरोग्य विभागाचा तसा संबंध नाही, असेही टोपेंनी म्हटले.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.