डोंबिवली/प्रतिनिधी – तासनतास लसीकरण केंद्राबाहेर कुपनसाठी ताटकळनाऱ्या नागरिकाच्या सोयीसाठी डोंबिवलीतील आरंभ ढोलताशा पथकाने पुढाकार घेतला आहे. लसीकरण केंद्राबाहेर लागणाऱ्या लांबलचक रांगा टाळण्यासाठी आरंभ प्रतीष्ठानने टोकन पद्धत सुरु केली आहे. डोंबिवली एमआयडीसी मधील अभिनव विद्या मंदिरात महापालिका आणि आरंभ प्रतिष्ठानच्या वतीने लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी 30 लसीकरण केंद्र असली तरीही लसीकरण केंद्राबाहेर रात्री 11 वाजल्यापासून तर काही केंद्राबाहेर पहाटे पासून लसीकरणाचे टोकन मिळविण्यासाठी रांगा लागतात. यामुळे करोना पसरण्याची धास्ती असल्याने तसेच नागरिकाची या त्रास पासून सुटका करण्यासाठी आरंभ प्रतिष्ठानने ऑनलाईन कुपन प्रणालीचा पर्याय शोधला आहे. यात टोकन हवे असलेल्या व्यक्तीने आरंभ प्रतिष्ठानच्या व्हाट्सअप नंबर वर मेसेज केल्यास त्या नंबरवर टोकनसाठीच्या फॉर्म असलेली गुगलची लिंक पाठवली जाते. हा फॉर्म डाऊनलोड करून भरून तो पुन्हा सबमिट केल्यानंतर अर्धा तासात टोकन नंबर धाडला जातो. हा फॉर्म भरून टोकन घरबसल्या मिळवता येते.
परीणामी शहरातील इतर लसीकरण केंद्राबाहेर दिसणाऱ्या लांबलचक रांगा अभिनव शाळेतील लसीकरण केंद्राबाहेर मात्र दिसत नाहीत. यामुळे नागरिकाची त्रासातून सुटका होत असून महापालिकेने सर्वच केंद्रावर अशा पद्धतीने टोकन उपलब्ध करून द्यावेत ज्यामुळे नागरिकांची रात्रभर रांगेत ताटकळत राहण्याच्या शिक्षेतून सुटका होऊ शकेल आणि सर्वसामान्य नागरिकांना विनासायास लस उपलब्ध होईल अशी नागरिकाची मागणी आहे.