शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या टॉप पाचमधील कामगिरीबाबत अभिमान वाटत असल्याचे म्हटले आहे. त्यावेळी मुख्यमंत्री घरातून बाहेरच पडले नसल्याची विरोधकांची टीका होत असल्याच्या प्रश्नावर ते चांगलेच तापले. ‘घरातून बाहेर न पडताच ते टॉप पाचमध्ये आले का?’ असा प्रश्नही त्यांनी विचारला. विरोधी पक्ष नेहमीच टीका करत असतात. ते उकीरकडे फुंकत हिंडल्याची बोचरी टीकादेखील राऊत यांनी विरोधकांवर केली. कोरोना विषाणूच्या संकटातून जनतेला बाहेर काढण्याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे प्रयत्न चालू आहेत. शिक्षण असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, डेव्हलपमेंट असेल, या सगळ्याच बाबतीत सावधगिरीने पावले टाकून त्यांचे काम चालू आहे. त्यामुळे देशाचे लक्ष त्यांच्या कामगिरीकडे लागले आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले. तसेच विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना, ‘घरी बसून टॉप पाचमध्ये येता येतं का?’ असाही थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी इशारा दिल्यानंतरही तुम्ही हे मुद्दाम करत आहात
कोरोना काळात सगळ्यांचेच काम हे वर्क फ्रॉम होम असे होते. तुम्ही उकीरडे फुंकत हिंडलात सगळीकडे, असे म्हणत विरोधकांवर जबरी टीका केली. भाजप नेते व केंद्रीय मंत्र्यांच्या जनआशीर्वाद यात्रेवरही राऊत चांगलेच तापले. जनआशीर्वाद यात्रा म्हणजे कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेला केलेलं आमंत्रण आहे. ज्याप्रकारे या गर्दीचे नियंत्रण आहे, लोकांना एकत्र करताय हे तिसऱ्या लाटेला आमंत्रणच आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इशारा दिल्यानंतरही तुम्ही हे करत आहेत, म्हणजे मुद्दामच, परंतु किमान संयम पाळा, असेदेखील राऊत यांनी म्हटले.
देशातील टॉप पाच मुख्यमंत्र्यांमध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांचा समावेश
देशातील वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचे व कामगिरीचे सर्वेक्षण इंडिया टुडे या माध्यम समूहाद्वारे करण्यात आले होते. त्यामध्ये देशातील टॉप पाच मुख्यमंत्र्यांमध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे व तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बऱ्याचदा, जेव्हा जेव्हा असे सर्वेक्षण झाले तेव्हा टॉप दहा अथवा टॉप पाचमध्ये आले आहेत. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे टॉप दहामध्ये होते, पण आज ते टॉप पाचमध्ये आले आहेत. ते कायमच आपल्या कार्यकुशलतेमधून हळूहळू देशामध्ये पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री बनतील, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
हा जनतेचा कौल आहे
उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये नेहमी राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम केले आहे. खासकरून कोरोना काळात ज्या प्रकारे त्यांनी मुंबईसह संपूर्ण राज्याला कंट्रोल केले. त्यामुळे ते राज्यात नंबर वन आहेत. हळूहळू त्यांचा ग्राफ वाढेल व या यादीत ते पहिले ठरतील. आणखी भाजपचे मुख्यमंत्री या यादीत स्थान आणू शकले नाहीत. आता भाजपवाले या पोलवर आक्षेपदेखील घेतील, नावं ठेवतील. जेव्हा तुमची नावं येत होती तेव्हा पोल नेहमीच योग्य होता. आता आमच्या मुख्यमंत्र्यांचे नाव येत असेल आणि ममता बॅनर्जींचे नाव येताच तुम्ही सवाल विचारायला सुरुवात कराल. हा पोल आहे आणि जनतेचा कौल आहे, असे ते म्हणाले.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.