ठाणे : मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे येथे सुप्रसिद्ध मराठी ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या ‘मधु मंगेश कर्णिक’ यांच्या समग्र साहित्याचा आस्वादक अंगाने ४५ संवेदनशील लेखकांनी लिहिलेल्या ५२ आस्वादात्मक लेखांच्या, ठाणे कोमसाप अध्यक्षा मेघना साने यांनी संपादित केलेल्या ‘मधुबन’ या पुस्तकाचे प्रकाशन रोजी मोठ्या दिमाखात पार पडले.
या कार्यक्रमास नव्वदी पार केलेले खुद्द पदमश्री मधु मंगेश कर्णिक, सुप्रसिद्ध लेखक प्रवीण दवणे, ठाणे कोमसाप अध्यक्षा आणि पुस्तकाच्या संपादिका मेघना साने, केंद्रिय कार्याध्यक्षा नमिता कीर, कोमसाप सल्लागार प्रदीप ढवळ, उद्वेली बुक्स प्रकाशक विवेक मेहेत्रे, कार्यवाह राजेश दाभोळकर, ठाणे कोमसाप कार्याध्यक्ष माननीय गीतेश शिंदे, अशोक चिटणीस, वासंती वर्तक आणि मधुबनचे सर्व लेखक उपस्थित होते.
सुप्रसिद्ध लेखक प्रवीण दवणे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रा. प्रवीण दवणे सरांनी “सरस्वतीने वीणावादन करावं असे लेखन केलेल्या मधुभाईंना त्यांच्या नातवंडांनी दिलेला हा ‘मानाचा मुजरा’ आहे, मधुभाईंचं साहित्य हे समाजाला दिशा देणारं साहित्य असून ते प्रत्येकाने वाचलंच पाहिजे असं आहे.” असे सांगत, ५२ लेख असलेल्या या ‘बावनकशी’ पुस्तकावर बोलायचं झाल्यास चार सेमिनार लागतील तसेच प्रत्येक लेखाचं लेखकांच्या नावासहित वैशिष्ट्य आपल्या मनोगतातून उलगडून दाखवलं. तीस दिवसात पंचेचाळीस लेखकांना सोबत घेऊन कार्य केलं, प्रतिकूल परिस्थिती असतानाही सगळ्या लेखकांनी उत्तम सहकार्य केलं, असे अध्यक्षा मेघना साने यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. नमिता कीर यांनी या पुस्तकाने नवोदितांना आत्मविश्वास दिला, मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षा वासंती वर्तक यांनी मधुभाईंच्या खात्यावर मोठा आनंद जमा झालाय, तर प्रकाशक विवेक मेहेत्रे यांनी ‘मधुबन’ होणे हे कृष्णाने गोवर्धन उचलण्यासारखे आहे असे आपल्या मनोगतातून सांगितले. मधुभाईंच्या शुभेच्छा पत्राचे वाचन प्रा. प्रतिभा सराफ यांनी केले. “लेखकांनी वाड्मयीन कार्य हाती घेऊन यशस्वी केले, याचा आपल्याला खूप आनंद झालाय”,” असे सांगून मेघनाताई व साऱ्या आस्वादकांना मधुभाईंनी धन्यवाद दिले.
कार्यक्रमात मधुभाईंना विनोद पितळे यांनी मधुभाईंवर केलेल्या कवितेची फ्रेम व सन्मानचिन्ह भेट दिली. मान्यवरांचे पुष्पगुच्छ व मधुबन पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. मधुबनच्या लेखकांना पुस्तके देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सगळ्यांची मनोगते, विनोद पितळेंचीआदरयुक्त काव्यरचना, हेमंत साने यांनी काव्यरचनेला चढवलेला स्वरसाज, सर्व नवोदित लेखक नातवंडांचे प्रेम हे सारं पाहून मधुभाईंचे भरलेले डोळे शब्दांपेक्षा बोलके होते.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन साधना ठाकूर, संगीता कुलकर्णी आणि प्रतिक्षा बोर्डे यांनी केले. कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे पालन करून हा सोहळा अतिशय उत्साहात झाला.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.