नागपूर : जुने वर्ष संपून नव्या वर्षाची सुरूवात झाली आहे. कोरोनाच्या सावटाखालीच यंदाही नव्या वर्षाचे स्वागत झाले. प्रत्येकांनीच आपापल्या घरात नवं वर्ष साजरं करण्यास प्राधान्य दिलं.
अनेकांनी या नव्या वर्षात नवे संकल्पही केले आहेत. सामान्य नागरिकांप्रमाणेच मंत्री, आमदार, खासदारही नव्या वर्षात काही संकल्प करत असतात. मुंबई, महाराष्ट्राला जल प्रदूषणापासून मुक्त करण्याचा सर्वांनीच संकल्प करावा असे आवाहान करत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नववर्षाचे स्वागत केले आहे. तर महाविकास आघाडी सरकार घालवणं, रिपब्लिकन पक्ष मजबूत करणं, सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेणं असा नवीन वर्षाचा संकल्प केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.
कोरेगाव भीमा येथे शनिवारी 204 वा शौर्य दिन साजरा होत आहे. रामदास आठवलेही विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी पोहचले होते. यावेळी रामदास आठवले यांनी आपला संकल्प केला. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही नव्या वर्षाचा संकल्प केला आहे.
“महाराष्ट्राला जल प्रदूषणापासून मुक्त करण्याचा सर्वांनीच संकल्प करावा,” असे म्हणत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नववर्षाचे स्वागत केले.
“येणारं वर्ष सगळ्यांच्या आयुष्यात प्रगती आणि विकासाकडे नेणारं ठरेल. सगळ्यांनी एक संकल्प केला पाहिजे की, वायू, ध्वनी आणि जल प्रदूषणापासून आपला देश आणि राज्य मुक्त करण्यासाठी आपण या वर्षात प्रयत्न करु. पूर्ण देशाला प्रदूषणापासून मुक्त करु असा संकल्प मी केलेला आहे. तुम्हीही असा संकल्प करावा आणि देशाला वाचवण्याचं काम करावं असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले आहे.
“देशात इकॉनॉमी, इकोलॉगी आणि एन्वारमेंट हे तीन महत्त्वाचे अजेंडे आहेत. इथिक्सच्या बाबतीत देशातील आणि राज्यातील परंपरा खूप मोठी आहे. देशासह राज्यात वायू, ध्वनी, जल प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे. जल मार्ग बनवण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. नद्या अतिशय दुषित आहेत. समुद्रात सगळं घाण पाणी मिसळत आहे. त्यामुळेच मुंबईसह महाराष्ट्राला जलप्रदूषणापासून मुक्त करायचं आहे. नागपूरला नागनदीला शुद्ध ठेवण्याच्या प्रकल्पाला सुरुवात होत आहे. जलसंवर्धन, जलशुद्धीकरण इथेनॉल, बायोडिझेल, बायो सीएनजी, इवेक्टिकसोबत ग्रीन हायड्रोजनचा प्रसार करणार आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात दिल्लीत ग्रीन हायड्रोजनवर चालणारी गाडी धावेल. नागपुरात इलेक्ट्रिकच्या वाहनातून फिरत आहे. ग्रीन हायड्रोजन फरिदाबादमध्ये तयार होईल. पहिली ग्रीन हायड्रोजनची गाडी पायलट प्रोजेक्ट म्हणून त्यात फिरणार आहे. पाण्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार व्हावा हे स्वप्न आहे. येणाऱ्या काळात ग्रीन हायड्रोजन निर्यात करणारा देश आपल्याला व्हायचं आहे, असे मत नितीन गडकरी यांवी व्यक्त केले.
“येणारे नवीन वर्ष सुख समृद्धिचे जावे, कोरोना आपल्यातून निघून जावा आणि मोकळ्या विश्वासाने जगण्याची संधी प्राप्ती व्हावी अशा शुभेच्छा देत राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी नव्या वर्षाचा संकल्प आहे.
“ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था ज्याच्यावर चालती ती गरिबाची शेळी, मेंढी गरीब माणसाच्या घरी पोहचून त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मोठा व्यवसाय उभा करणार आहे. त्याच प्रमाणे नागपूर युवा कल्याण हेडखाली जागतिक पातळीच्या लोकांना आणून युवा संमेलन घेऊ. शिवाय नागपूरचा असल्याने मानकपूरच्या स्टेडियमवर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या बांधकामला सुरवात करून दोन वर्षात पूर्ण करू असा संकल्प सुनील केदार यांनी केला आहे.
“या नवीन वर्षात राज्यातील शेतकरी आणि शेतमजूर अतिशय आनंदित राहावा अशी प्रार्थना करतो. तीन कायदे रद्द झाले, आता नवीन धोरण शेतकऱ्यांच्या मजबुतीसाठी करणं फार गरजेचं आहे. तोच संपल्प मी करत आहे, अशी माहिती राज्यमंत्री बच्चू यांनी दिली.
राज्यातील अपंग आणि दुर्लक्षित बांधवासाठी नवीन योजना आणत आहे. याची सुरुवात प्रायोगिक तत्वावर 150 अपंग बांधवांसाठी अकोला येथे सुरु केली आहे. ज्यामध्ये या योजनेमधून प्रत्येक अपंग बांधवांना किमान 5 ते 7 हजार रुपये महिना मिळेल अशी ही योजना आहे, असेही यावेळी बच्चू कडू यांनी सांगितले.