मुंबई : कोरोनामुळे एसटीची प्रवासी संख्या कमी झाल्याने त्याचा उत्पन्नाला फटका बसला आहे. त्यातच डिझेलच्या दरातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. महामंडळाच्या ताफ्यात डिझेलवर धावणाऱ्या १७ हजार बसेस असून डिझेलवर होणारा खर्च हा एकूण खर्चाच्या ३४ टक्के इतका होता. वाढत्या डिझेल किमतीमुळे तो आता ३८ ते ४० टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे घटलेली प्रवासी संख्या आणि इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे महामंडळाच्या तिजोरीवर आर्थिक बोझा पडत असल्यामुळे महामंडळ दिवसेंदिवस आर्थिक गर्तेत अडकले जात आहे.
अशा परिस्थितीत महामंडळावरील आर्थिक बोझा कमी करण्यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब हे वेगवेगळया पर्यायांचा अवलंब करीत आहेत. जसे शासकीय व खाजगी मालवाहतूक, शासकीय वाहनांची देखभाल दुरुस्ती, खाजगी बसची बांधणी, खाजगी वाहनांचे टायर पुन:स्तरीकरण इत्यादी. त्याच अनुषंगाने डिझेलवर होणाऱ्या कोट्यावधी रूपयांच्या खर्चाचा गांभीर्याने विचार करत डिझेलला पर्यायी इंधनाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एसटी महामंडळाने आपल्या ताफ्यातील १ हजार गाड्या सीएनजीमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएनजी या पर्यायी इंधनावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये रुपांतर करण्यासाठी आवश्यक निधीसाठी महामंडळाने उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. रिट्रोफिटमेंटसाठी एकूण १४० कोटी रूपयांची मागणी महामंडळाने केली होती.

महामंडळाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सन २०२१-२०२२ च्या अंदाज पत्रकात या निधीची तरतूद केली आहे, असे ॲड. परब यांनी सांगितले. त्यानुसार डिझेलवर धावणाऱ्या एसटी बसेसचे सीएनजी वाहनांमध्ये रूपांतर करण्यासाठी निविदाही मागविण्यात आल्या आहेत. एसटीच्या ताफ्यात लवकरच सीएनजी बरोबरच इलेक्ट्रीक, एलएनजी अशा पर्यावरणपुरक इंधनावर धावणाऱ्या बसेस दाखल होणार आहेत. त्यामुळे भविष्यात इंधनावरील खर्चाच्या बचतीबरोबरच पर्यावरणपुरक प्रवासाला एसटी प्राधान्य देणार आहे, असे प्रतिपादन मंत्री ॲड. परब यांनी केले आहे.
इंधनाचा खर्च कमी करण्यासाठी सीएनजीबरोबरच इतर पर्यायांचाही वापर करण्याचे निर्देश ॲड.परब यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. पर्यावरणीय बदलामुळे बिघडलेले निसर्गचक्र रोखण्यासाठी तसेच डिझेलच्या वाढत्या किमती पाहता प्रवाशांना प्रदुषणमुक्त प्रवास घडविण्यासाठी एसटी महामंडळाने पर्यावरणपुरक इंधनाचा पर्याय निवडला आहे. त्यासाठी सद्या डिझेलवर धावणाऱ्या १ हजार गाड्यांचे सीएनजी या पर्यायी इंधनामध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. या रिट्रोफिटमेंटसाठी राज्य सरकार एसटी महामंडळाला निधी देणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली. सीएनजीमुळे इंधनाचा खर्च कमी होऊन प्रदुषणामुळे पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यास एसटी महामंडळाचा नक्कीच हातभार लागेल, असा विश्वासही मंत्री, ॲड. परब यांनी व्यक्त केला.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.