डोंबिवली/प्रतिनिधी – राजकारणी व्यक्ती असो की सर्वसामान्य, कोरोनाचे नियम हे सर्वांना सारखे आहेत. आणि ते नियम पाळून सर्व गोष्टी करणे आवश्यक असल्याचे मत मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले आहे. सध्या ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी निघणाऱ्या भाजपच्या जन आशिर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले असून त्याबाबत बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
कोरोनाचे नियम सर्वांना सारखे आहेत. कुठेही आपल्याकडून कोरोना पसरवला जाणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. कोरोना नियमांमध्ये कोणतीही विशेष कॅटेगरी नाहीये. मग त्यात लोकप्रतिनिधी असोत की राजकीय नेते किंवा मग आम्ही असू दे. कोरोना नियम मोडले तर आमच्यावरही कारवाई झाली पाहीजे अशी अपेक्षा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.
तसेच आपल्या मतदारसंघात मोठ्या गतीने रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्याशिवाय 380 कोटी रुपये कल्याण डोंबिवली, एमआयडीसीतील रस्त्यांसाठी मिळालेले आहेत. त्याचबरोबर कल्याण – शिळ रोडचे काम प्रगतीपथावर असून पलावा उड्डाणपूल, काटई उड्डाणपूल यांची कामेही मंजूर झाली आहेत. विकासकामे संथगतीने सुरू असतील तर त्यांना गती प्राप्त करून देणे हे लोकप्रतिनिधीची जबाबदारी असून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघाबाबत बोलता आहेत की आपल्या मतदारसंघातील रस्त्याबाबत बोलत आहेत हे माहिती नसल्याचा टोलाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी लगावला.