वसई-विरार (vasai virar) पोलीस आयुक्तालयाने विसर्जनाकरिता खास गाईडलाईन लागू केल्या आहेत. रात्री आठच्या आत विसर्जन करणे बंधनकारक करण्यात आले असून, विसर्जन ठिकाणी फक्त चार भक्तांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याचे पालिकेने जाहीर केले आहे. गणेशोत्सवाकरिता वसई-विरार महापालिका हद्दीमध्ये पालिका व पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन काल करण्यात आले. दीड ते अकरा दिवसांपर्यंतच्या गणेशोत्सवाकरिता शासनाच्या सूचनेप्रमाणे वसई-विरार महापालिका व मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयामार्फत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. आता त्या सूचनांप्रमाणेच प्रत्येक गणेशभक्त, गणेश मंडळांना आपला उत्सव साजरा करायचा आहे.
महापालिका व पोलीस प्रशासनामार्फत हे आवाहन
विसर्जनाकरिता महापालिकेने नऊ प्रभागांमध्ये एकूण ४४ तलाव निश्चित केले असून, याच तलावावर शासनाचे नियम पाळून गणरायाचे विसर्जन करण्यात येणार आहे. विसर्जनाच्या त्यावेळी गर्दी टाळण्याकरिता प्रत्येक गणेशभक्तांनी आपल्या मंडळामध्ये अथवा घरीच आरती घेऊन, विसर्जन स्थळावर जायचे आहे. मूर्तीबरोबर केवळ चार गणेशभक्तांना प्रवेश दिला जाणार असून, रात्री आठ वाजेपर्यंतच विसर्जन करणे सर्वांना बंधनकारक करण्यात आले आहे. वसई-विरार, नालासोपारा परिसरामधील कायदा-सुव्यवस्था राखण्याकरिता साडेचारशे पोलीस अधिकारी व एक हजार सातशे पन्नास पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच वाहतूक शाखा, दंगल नियंत्रण पथक, होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दलदेखील तैनात झाले आहेत. विसर्जन तलाव, मोक्याचे नाके, वाहतूक कोंडी होणारे परिसर व नाकाबंदी करण्याकरिता स्वतंत्र पोलीस यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्याकरिता सर्व गणेशभक्तांनी शासनाचे सर्व नियम पाळून विसर्जन व पुढील बाप्पाचा उत्सव साजरा करण्यात यावा, असेही आवाहन महापालिका व पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
विसर्जनासाठी प्रशासन सज्ज
विघ्नहर्ता गणरायाचे राज्यामध्ये वाजतगाजत व जयघोष करत स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर विधीवत पूजाअर्चा करत बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. काल दीड दिवसाच्या बाप्पांचे विसर्जन झाले. त्याकरिता ठाणे व मुंबई सज्ज झाली होती. ठाण्यामध्ये बाप्पाच्या स्वागताकरिता चार हजार पोलीस तैनात ठेवण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गणेशोत्सवामधील शांततेकरिता दोनशेपेक्षा जास्त उपद्रवी व्यक्तींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ठाण्यामध्ये एक लाख ४१ हजार २० घरगुती, तर १ हजार ५८ सार्वजनिक बाप्पांचे ठाण्यात विराजमान झाले आहे.
ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग सुविधा १ सप्टेंबरपासून चालू
गणेश विसर्जन करताना कोरोना नियमांचे पालन व्हावे म्हणून ठाणे महापालिकेच्या डीजीठाणे प्रणालीच्या माध्यमातून यावर्षीही ऑनलाईन गणेश विसर्जन टाईमस्लाॅट बुकिंग सुविधा सुरू केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाच्या वेळी गर्दी होऊ नये याकरिता ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये गणेशमूर्ती विसर्जनाकरिता डीजीठाणे प्रणालीमार्फत ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग सुविधा १ सप्टेंबरपासून चालू करण्यात आली आहे. या वर्षी गणेश विसर्जनाकरिता ठाणे महानगरपालिकेमार्फत एकूण ४० स्थाने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामध्ये ७ घाट, १३ कृत्रिम तलाव व २० स्वीकृती केंद्रांचा समावेश आहे. डीजीठाणे प्रणालीच्या माध्यमातून मूर्ती विसर्जन करण्याकरिता ऑनलाईन टाईमस्लॉट बुकिंग सुविधा १३ कृत्रिम तलाव व वीस स्वीकृती केंद्रांवर उपलब्ध असणार आहे. सदर भागात श्रींचे विसर्जन करण्याकरिता डीजीठाणे प्रणालीमार्फत तयार केल्या गेलेल्या www.ganeshvisarjan.covidthane.org या संकेतस्थळावर विसर्जनाचा टाइमस्लॉट बुक करावा.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.