तंत्रज्ञान व इतर क्षेत्रांमधील प्रगतीमुळे जग आपल्या जवळ आले असे आपण म्हणतो. जागतिकीकरणानंतर अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात स्थापन झाल्या. भारतासारख्या बहुभाषिक देशामध्ये भाषांतरकाराची गरज मोठ्या प्रमाणावर लागते. भाषांतरकाराचे मुख्य काम हे एका भाषेतील माहिती अथवा मूळ मजकूर दुसऱ्या भाषेत भाषांतरित करणे असते. भाषांतरकाराने अचूकरीत्या एका भाषेतील मजकूर दुसऱ्या भाषेत कोणताही अर्थ न बदलता करणे गरजेचे असते. भाषांतर करून तुम्ही चांगल्या कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळवू शकता, तर स्वत: भाषांतराची कामं घेऊन उत्तम पैसे मिळवता येतात. एखाद्या विद्यार्थ्याला भाषांतरकार म्हणून काम करायचे असल्यास त्याने संबंधित भाषा विषयामधील पदवी व पदविका अभ्यासक्रमात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
किमान पात्रता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक
भाषांतर अभ्यासक्रमाचे तीन प्रकार आहेत. विद्यार्थी प्रमाणपत्र अभ्यासक्रम व पदवी अभ्यासक्रम तसेच पदविका अभ्यासक्रम करू शकतात. प्रमाणपत्र व पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्याची किमान पात्रता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तर पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थी प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. देशभरातील वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये भाषांतराचे अभ्यासक्रम चालवले जातात. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या दूरस्थ शिक्षण विभागामार्फत भाषांतर अभ्यासक्रम चालवला जातो.
विविध क्षेत्रांत भाषांतर करण्याची संधी
भाषांतराचे योग्य शिक्षण व प्रशिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांत भाषांतरकार म्हणून काम करू शकतात. आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामधील भाषांतरकार, कायदेशीर व न्यायालयीन क्षेत्रामधील भाषांतरकार, ग्रंथालयातील भाषांतरकार या क्षेत्रामध्ये काम करता येऊ शकते. सॉफ्टवेअर, वृत्तपत्रे, मासिक, शैक्षणिक सेवा, रुग्णालय, पर्यटन, हॉटेल, प्रदर्शन, रेडिओ इत्यादी ठिकाणी नोकरीची संधीदेखील मिळू शकते.
उत्तम पगार मिळतो?
भाषांतरकार म्हणून काम करताना पदाप्रमाणे व अनुभवानुसार अठरा हजार ते एक लाख रुपयांपर्यंत पगाराची नोकरी वेगवेगळ्या ठिकाणी मिळते. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भाषांतर करण्याची गरज वाढलेली आहे. नवनव्या कंपन्या भारतात दाखल होत असल्याने भाषांतरकारांना उत्तम पगाराच्या नोकऱ्या मिळू शकतात.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.