केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरामध्ये धुमश्चक्री सुरू आहे. शिवसैनिकांनी तर नारायण राणेंच्या प्रतिमेला जोडे मारले, शाईफेक केली, एवढेच नाही तर नाशिक व ठाण्यामध्ये शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर दगडफेकही केली. नाशिक पोलीस व पुणे पोलिसांचे पथक नारायण राणे यांना अटक करण्याकरिता थेट कोकणात रवाना झाले. मुख्यमंत्र्यांना देशाचा कितवा स्वातंत्र्य दिवस हे नीट आठवत नाही, त्या ठिकाणी मी असतो तर कानाखाली खेचली असती, असे टोकाचे वक्तव्य नारायण राणे यांनी केले होते, तर एकूणच राणे यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्याविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड, पुणे, नाशिक, रायगडमध्ये राणेंविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.
राज ठाकरे काय म्हणाले?
या सर्व राड्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी कृष्णकुंज या निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. दोघांमध्ये काहीकाळ चर्चा झाली असून, राज्यातील आजच्या राजकीय परिस्थितीसंदर्भातही चर्चा झाली. आज जे काही सुरू आहे ते व्हायला नकोच होते, चुकीच्या पद्धतीने सगळं काही होत आहे, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडल्याची सूत्रांची प्राथमिक माहिती असून, राज ठाकरे सध्यातरी या विषयावर अधिकृतपणे बोलणार नाहीत, अशीदेखील माहिती सूत्रांनी दिली.
नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यामागे हे कारण…
‘त्यांचे ॲडव्हाईज कोण, त्यांनाच काही कळत नाही. ते काय आम्हाला ॲडव्हाईज करणार? ते काय डॉक्टर आहेत का? तिसऱ्या लाटेचा कुठून आवाज आला त्यांना? तसेच ती पण लहान मुलांना? अपशकुनासारखे बोलू नको म्हणावं, त्याला बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव व बोल म्हणावं. त्या दिवशी नाय का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे हीरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखाली चढवली असती. हे काय देशाच्या स्वातंत्र्य दिनाची तुम्हाला माहिती नसावी?’ , अशा शब्दांमध्ये नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलताना त्यांची जीभ परत एकदा घसरली असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली लावण्याची भाषा राणेंनी केली. राणे सध्या कोकण दौऱ्यावर जन आशीर्वाद यात्रेकरिता आहेत. त्याच वेळेस राणे महाडमध्ये पत्रकारांसोबत बोलत होते. आता नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. राणेंवर राज्यभरामध्ये विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.