ठाणे : कोलशेत नंदीबाबा चौक ते क्लॅरियंट कंपनी चौक येथे ठाणे महानगरपालिकेतर्फे प्रस्तावित विकास रस्त्यामध्ये ४३१ वृक्ष बाधित होत असून त्यापैकी ३० वृक्षांची बेकायदेशीरपणे तोड करण्यात आली आहे. या वृक्षतोडीमुळे येथील जैवविविधता धोक्यात आल्याचा निष्कर्ष पर्यावरण तज्ञांच्या अभ्यासातून निघाला आहे.
वृक्ष प्राधिकरणाने या प्रस्तावाला मंजुरी देताना वारसा वृक्षांची मोजदाद न केल्याने तसेच बाधित वृक्षांवर पावसाळ्यात पक्ष्यांची घरटी व पिले आहेत हे माहित असतानादेखील सर्वसामान्यांचा विरोध डावलून ३० पेक्षा जास्त वृक्षांची अवैधरित्या तोड केली होती. याची तक्रार १८ जुलै रोजी स्थानिकांनी महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांचेकडे केली होती तसेच वन विभागाच्या उपवन संरक्षकांनाही अवगत केले होते. महिना उलटूनदेखील नागरिकांच्या या पत्रव्यवहाराचा अजूनही कोणताही प्रतिसाद यंत्रणांनी दिला नसल्याने आंतरराष्ट्रीय कीर्तिमान प्राप्त ठाणेस्थित वृक्षतज्ञ सीमा हर्डीकर व हर्षद ऐनापुरे तसेच अनेक वैज्ञानिक अहवाल प्रसिद्ध करणारे प्राणी व पक्षीतज्ज्ञ प्राध्यापिका क्लारा कोरिआ व अविनाश भगत यांनी नागरिकांतर्फे कोळशे येथील बाधित वृक्षांची पाहणी केली.
सुमारे महिनाभर परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून या ठिकाणचा सर्वांगाने अभ्यास केला गेला. सदर वैज्ञानिक अभ्यास अहवाल तज्ज्ञांकडून सर्वसामान्य ठाणेकरांच्या माहितीसाठीव अलीकडेच प्रसिद्ध केला असून कोलशेत येथील अमूल्य वृक्षसंपदा व जैवविविधता टिकवून ठेवण्याचे त्यात आवाहन करण्यात आले आहे. बाधित वृक्षांपैकी आंबा, वड, जांभूळ वृक्ष नैसर्गिक परीससंस्थेसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. हे वृक्ष पशु पक्षी प्राणी यांसाठी अन्न मिळविण्याचे प्रमुख स्रोत असल्याने स्थानिक जैवविविधतेसाठी ते अत्यंत उपयुक्त आहेत. या वृक्षांचा घेर हा ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या निकषानुसार तपासून पाहिल्यास त्यांची नोंद खरेतर वारसा वृक्षांमध्ये व्हायला हवी. परंतु ठामपाने वस्तुस्थितीकडे संपूर्णतः दुर्लक्ष करून यांना तोडायची परवानगी दिली आहे.
वृक्ष प्राधिकरणाने परवानगी देताना ४६ वृक्षांना “जंगली” असे संबोधिले आहे यावर अहवालात तज्ज्ञांनी तीव्र आक्षेप नोंदविला असून वृक्ष प्राधिकरणाच्या हलगर्जीपणाबद्दल ताशेरे ओढले आहेत. ठामपाला ओळख पटविता न आलेल्या अनेक वृक्षांपैकी एका दुर्मिळ वृक्षाचे नाव “उर्वशी” असून याचे मूळ ब्रह्मदेशात आहे. ब्रह्मदेशातूनसुद्धा याचे उच्चटन झाल्याने हा वृक्ष दुर्मिळ प्रकारात मोडतो. हा ठाण्यातील एकमेव ज्ञात वृक्ष असल्याने त्याला कोणत्याही परिस्थितीत धोका पोहोचवू नये, असे मत अहवालात मांडण्यात आले आहे. यात दोन पांढरे रेशीम वृक्ष असून वटवाघळांच्या फळे खाणाऱ्या जातीला अन्न पुरविण्याचे प्रमुख स्रोत आहेत. बाधित वृक्षांपैकी एक वड कुळातीलI खारोटा असून येऊरच्या जंगलात उपलब्ध असणाऱ्या वृक्षांपेक्षाही याचा विस्तार अधिक असल्याने त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. या वृक्षांचे सर्वप्रथम संरक्षण करावे, त्यासाठी सुयोग्य पर्यायी मार्गांचा विचार करावा व तसे करणे अगदीच अशक्य असल्यासच या वृक्षांचे त्तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक पद्धतीने पुनर्रोपणाचा विचार करावा. असेही अहवालात म्हटले आहे.
ठाणे प्रदेशात दिसणाऱ्या ४७५ पक्ष्यांच्या प्रजातींपैकी १८५ पक्ष्यांच्या प्रजाती कोलशेत परिसरात आढळून येतात, ज्याचे प्रमाण ठाण्यात आढळणाऱ्या एकूण पक्ष्यांच्या ३८.९५ % आहे. पूर्वीपासून येथे असलेल्या कंपन्यांच्या आवारात हि जैवविविधता समृद्ध होत गेली परंतु आता रहिवासी वापरासाठी वृक्षतोड सुरु झाल्याने सर्व प्रजाती येथून लुप्त पावत आहेत हि धोक्याची घंटा आहे. कोलशेत येथे आढळणाऱ्या पक्ष्यांपैकी २२.२० % पक्ष्यांचे संरक्षण केले पाहिजे. त्यातील चार प्रकारचे पक्षी हे कोलशेत येथे कायम वास्तव्य करून असलेल्या प्रजाती आहेत. एकूण ५२% पक्षी निवासी आहेत तर ४८% पक्षी स्थलांतरित आहेत. महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल याचा येथे २०१३ सालापासून अधिवास असल्याच्या पुराव्यासहित नोंदी आहेत. हरियालने मोठ्या संख्येने येथील झाडांवर घरटी बांधल्याची नोंद आहे. आफ्रिकेतून स्थलांतर करणाऱ्या अमूरचा ससाणासारख्या ८३ पक्ष्यांच्या प्रजाती प्रवासामध्ये थांबण्यासाठीचा टप्पा म्हणून कोलशेत येथील झाडांचा काही काळापुरता आश्रय घेतात. त्यांना त्यांच्या आश्रयापासून हिरावून घेणे क्रूरपणाचे ठरेल.
गेल्या काही वर्षात मेट्रो, उड्डाणपूल, गृहनिर्माण व व्यापारी संकुले इत्यादी. इत्यादींच्या बांधकामांमुळे प्राणी, पक्षी, वनस्पती यावर अगोदरच मोठा परिणाम झाला आहे. वैयक्तिक प्रजातींची संख्या चिंतादायक रित्या कमी होत आहे त्यामुळे विकासकामनासाठी अन्य पर्यायी उपाय शोधणे आवश्यक आहे. असा एक पर्याय ठाण्यातील पर्यावरण कार्यकर्ते रोहित जोशी यांनी तयार केला असून ठाणे महानगरपालिकेने मागणी केल्यास त्यांना पुढील चर्चेसाठी सुपूर्त करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त फुलपाखरे, सरीसृप, उभयचर, कीटक यांचाही अहवाल स्वतंत्रपणे बनविला गेला आहे.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.
Credits – Thane Vaibhav