मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील अटकेची कारवाई व त्यानंतर राज्यात सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर आज प्रथमच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर कार्यक्रमाला संबोधित केलं. एका उद्योगविषयक संमेलनात ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी थेट काही राजकीय भाष्य करणं कटाक्षानं टाळलं.
करोना संसर्गानंतर लागलेल्या लॉकडाऊनचा फटका बसलेल्या उद्योग क्षेत्राला मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. ‘उद्योगांना कुशल मनुष्यबळ निर्माण करून देण्याची जबाबदारी सरकारनं घेतली आहे. ‘उद्योग मित्र’सारखी संकल्पना आपण राबवत आहोत. हे ‘उद्योग मित्र’ राज्यात गुंतवणूक कशी करायची याचे उत्तम मार्गदर्शन करतील अशी व्यवस्था आपण निर्माण केली आहे. वन विंडो सिस्टीम आपण निर्माण केली आहे. गुंतवणूकीसाठी ‘आपलेपणा’ची भावना निर्माण करण्याचं काम सरकार करत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांना आश्वस्त केलं. ‘इतर राज्यातील मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन उद्योजकांना त्यांच्या राज्यात गुंतवणुकीचं आवाहन करतात. ही वेळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर येऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ‘महाराष्ट्राला उद्योग व उद्योजकांची खूप गरज आहे. उद्योजकांना सोयी सुविधा द्यायच्या आहेत, वीजेचा दर कमी करायचा आहे, पण समतोल साधत आपल्याला पुढं जायचं आहे. उद्योजकच महाराष्ट्राचे ब्रॅण्ड व्हावेत, असं मला वाटतं. त्यासाठी उद्योजकांना आवश्यक ते सर्व सहकार्य केलं जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. ‘अर्थचक्राला गती देण्याचा प्रयत्न आपण सुरू केला आहे. टप्प्याटप्प्यानं सगळं काही सुरू करायचं आहे. मास्क सुद्धा उतरवून ठेवायचा आहे. मात्र, त्यासाठी काही काळ थांबावं लागेल,’ असं मुख्यमंत्री म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे:
▪️ करोना काळ मागे वळून पाहण्यासाठी आहे. आपण काय केलं, काय करायचं होतं आणि काय केलं पाहिजे, हे ठरवण्यासाठी हा काळ महत्वाचा आहे.
▪️ विकासाबरोबर पर्यावरणाकडे आता लक्ष द्यावे लागणार आहे. आपल्यामुळे पर्यावरणाला धक्का लागणार नाही एवढी काळजी घेतली गेली पाहिजे.
▪️ राज्यात कोणत्या भागात कोणत्या उद्योगांची सुरुवात करता येईल हे सांगणारा नकाशा तयार केला जाईल. त्यानुसार लागणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
▪️ माहिती अभावी उद्योगांना विरोध होतो. ते टाळण्यासाठी लोकांना विश्वासात घेऊन प्रादेशिक उद्योग उभारायचे, स्थानिक लोकांना प्रशिक्षण देऊन तिथेच काम उपलब्ध करून द्यायचे याकडेही लक्ष देणे गरजचे आहे.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.