मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यात एक अज्ञात कार घुसल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतल्या साकिनाका परिसरात महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मुंबईतल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीनंतर निघाल्यावर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात एक अज्ञात मर्सिडीज कार अचानक घुसली. त्यानंतर सुरक्षा ताफ्यात एकच खळबळ उडाली होती. सुरक्षा रक्षकांनी तात्काळ संबंधित कार ताफ्यातून बाजूला घेत कार चालकाला ताब्यात घेण्यात आलं होतं.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत संबंधित कार चालक एक व्यापारी असल्याचं समोर आलं असून तो मलबार हिलच्या दिशेनं जात होता. कानात इअरफोन्स घातलेले असल्यानं मुख्यमंत्र्यांचा ताफा जातोय याची कल्पना आली नाही आणि लेन बदलून तो चुकून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात आला होता, अशी माहिती चौकशी दरम्यान समोर आली आहे. दरम्यान, संबंधित कार चालक व्यापाऱ्यावर वाहतूक नियमांचं उल्लंघन आणि सुरक्षेत अडथळा आणल्याबद्दलच्या अधिकृत कलमाखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सदर गुन्हा जामीनपात्र असल्यानं कार चालकाची तात्काळ जामीनावर सुटका देखील झाली आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.