ब्लॅक फंगस अर्थातच काळ्या बुरशीच्या भीतीमुळे एका दाम्पत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कर्नाटकमध्ये घडली. हे दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे आपल्याला आता ब्लॅक फंगस होणार या भीतीने त्यांनी सुसाईड नोट लिहून आपले आयुष्य संपवले. या सुसाईड नोटमध्ये पती म्हणतो, “माझ्या पत्नीला मधुमेह असून, न्यूज चॅनल्सनी दाखवले आहे, त्यावरून ज्या मधुमेही रुग्णांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला, त्यांना ब्लॅक फंगसचा धोका असतो. त्यामुळे आपण आपले अवयव गमावू शकतो आणि त्याची किंमत चुकवावी लागू शकते, त्यामुळेच आम्ही हा आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. दोघेही मंगलोरमध्ये एका आपर्टमेंटमध्ये राहत होते.
ऑडिओ क्लिप शहर पोलीस आयुक्तांना पाठवली
गेल्या काही दिवसांआधी दोघांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली असता, त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यामुळे व्यथित झालेल्या दाम्पत्याने आपले आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येआधी या दाम्पत्याने आपल्या मेसेजची ऑडिओ क्लिप शहर पोलीस आयुक्त यांना पाठवली होती. त्या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी ब्लॅक फंगसमुळे भीती वाटत असल्याचे म्हणत आम्ही आत्महत्या करणार असल्याचे सांगितले होते.
ऑडिओ क्लिपनंतर या दाम्पत्याला पोलिसांकडून आवाहन
ऑडिओ क्लिपवरून पोलीस आयुक्तांनी कोणतंही टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन केले होते. त्यांनी त्वरित या दाम्पत्याचा शोध चालू केला. एवढेच नव्हे तर त्यांनी माध्यमांनाही आवाहन करून या दाम्पत्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्याच काळात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, परंतु तोपर्यंत या दाम्पत्याने आपले आयुष्य संपवले होते. पतीने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्नीच्या आरोग्याच्या समस्येसंदर्भात लिहिले आहे. पत्नीला अपत्य होत नसल्यामुळे, ती समाजामध्ये वावरताना दचकत होती. वारंवार तिला विचारणा होत असल्यामुळे तिला अवघडल्यासारखे वाटत होते.
अंत्यसंस्काराकरिता सहकार्य करावे, घरामधील साहित्य गरिबांना वाटा
पुढे पत्नीने सुद्धा याच सुसाईड नोटमध्ये लिहिले, ती म्हणते, “मी व माझ्या पतीने ठरवले आहे की, आमच्यावर पारंपारिकरित्या अंत्यसंस्कार व्हावे, त्याकरिता आम्ही एक लाख रुपये ठेवले आहेत. त्याकरिता पोलीस आयुक्त यांनी आमच्या अंत्यसंस्काराकरिता सहकार्य करावे.” एवढेच नव्हे तर घरामधील साहित्य गरिबांना वाटा आणि आम्ही आमच्या घरमालकांची माफी मागतो, असेही या सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे.
Credits and Copyrights – Maay Marathi News.