मुंबई : राज्यात आर्यन खान आणि मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडत आहेत. काल भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्ती, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून साडेतीन कोटींची जमीन फक्त 20 लाखांत खरेदी केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. यानंतर नवाब मलिकांनीही पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला होता.
देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देत आता नवाब मलिक पुन्हा एकदा माध्यमांसमोर येणार आहेत. आज सकाळी 10 वाजता नवाब मलिक पत्रकार परिषद घेणार आहेत. यासंदर्भात नवाब मलिक यांनी ट्विट केले आहे. “त्यांची झोप उडाली आहे, आता शांतता गमावण्याची वेळ आली आहे, भेटुया आज सकाळी 10 वाजता”, असे ट्विट करत नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर नवाब मलिक यांनी म्हटले होते की, उद्या सकाळी देवेंद्र फडणवीसांचे अंडरवर्ल्डशी असलेले नाते उघड करणार आहे. तसेच, देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना अंडरवर्ल्डच्या साथीने राज्य वेठीस धरले होते, असेही नवाब मलिकांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस माझे नाव खराब करण्याचे काम करत आहेत. मागेही पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी माझ्या जावयाच्या घरात गांजा सापडला होता. याप्रकरणी माझी मुलगी तुम्हाला नोटीस पाठवत आहे, असेही नवाब मलिकांनी सांगितले होते. त्यामुळे नवाब मलिक आज नेमका काय गौप्यस्फोट करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.