मुंबई : एसटी कामगारांच्या संपाचा तिढा अद्यापही कायम आहे. विलिनीकरणाचा मुद्दा संप मिटण्यातील प्रमुख अडथळा ठरत असल्यानं मुंबई उच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीच्या वेळी याबाबत महत्त्वाचे निर्देश दिले. ‘राज्य सरकारनं नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीनं इतर संघटनांच्या प्रतिनिधींचंही म्हणणं ऐकून २० डिसेंबर रोजी प्राथमिक अहवाल द्यावा,’ अशा सूचना न्यायालयानं दिल्या. त्यामुळे हा संप आता पुढचा महिनाभर सुरु राहतोय की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेला एसटीचा संप मिटवण्यासाठी सरकारी पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
◼️ एसटी संपाबाबत पुढील सुनावणी 20 डिसेंबरला; संप महिनाभर सुरु राहणार?
मात्र, त्यास यश येताना दिसत नाही. विलिनीकरण ही मागणी कामगारांनी ठामपणे लावून धरली आहे. तर, त्यावर लगेचच कुठलाही निर्णय घेता येणार नाही. समितीच्या अहवालाची वाट पाहावी, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. त्याच अनुषंगानं आज न्यायालयानं २० डिसेंबरपर्यंत प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
‘एसटी संप सुरू असल्यानं ग्रामीण भागातील विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. विद्यार्थ्यांना करोनाच्या संकटामुळं आधीच दीड वर्षापासून प्रभावी शिक्षणापासून वंचित राहावं लागलं आहे, त्यांचं आणखी नुकसान होता कामा नये. त्यामुळं उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे एसटी बससेवा सुरू राहायला हवी, असं मत खंडपीठानं व्यक्त केलं. ‘एसटी महामंडळाचे शंभर टक्के कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळं कोणीही कामावर रुजू होणार नाही, असा दावा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेतर्फे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला. त्यावर, एसटीचे जे चालक आणि वाहक काम करायला येण्यास इच्छुक असतील त्यांना कोणीही अडवू नये आणि महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेच्या सदस्यांनी हिंसक मार्गाचा अवलंब करू नये. कोणीही हिंसक आंदोलन केल्यास त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे व न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिल्या.
‘महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेनं हिंसक आंदोलन करणार नसल्याची हमी यापूर्वीच हायकोर्टात दिली आहे. ती हमी यापुढंही पाळली जाईल आणि या संघटनेचे सदस्य आंदोलनात कोणत्याही हिंसक मार्गाचा अवलंब करणार नाहीत, सर्वसामान्य नागरिकांना पुरवल्या जाणाऱ्या वाहतूक सेवेत कोणताही अडथळा आणणार नाहीत, अशी आम्ही अपेक्षा करतो. असे प्रकार कोणीही केल्यास राज्य सरकारनं अशा व्यक्तींविरोधात तात्काळ गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करावी’, असं खंडपीठानं सांगितलं.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.