मुंबईकरांना प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बेस्टच्या वर्धापन दिनानिमित्त माहीम नूतनीकृत बस डेपोचे व बेस्टच्या नवीन चोवीस इलेक्ट्रिक बसेसचे अनावरण आज करण्यात आले. मुंबईमधील प्रवाशांना यापुढे तिकिटाच्या रांगेत फार वेळ ताटकळत उभे राहावे लागणार नाही, कारण सगळ्याच प्रकारच्या बेस्ट बस व लोकल प्रवासाकरिता एकच पास अथवा तिकीट चालू शकणार आहे. त्या दृष्टीने आता नियोजन सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली. ‘कोरोनाच्या काळामध्ये बेस्टने अत्यावश्यक सेवेमधील कर्मचारी आणि प्रवासी यांची अधिक प्रमाणावर वाहतूक केली. कुठेही अडचण येऊ दिली नाही. जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा केली. कोरोना काळामध्ये बेस्ट अधिकारी व कर्मचारी कोरोनाग्रस्त झाले, काहींचे मृत्यू झाले. परंतु बेस्ट थांबली नाही,’ अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
शिस्तबद्ध सेवा ही बेस्टची ख्याती आहे
‘बेस्ट व लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी असून, गेल्या काही काळापासून निसर्गचक्र बदलत आहे. आपले पर्यावरण जपले गेले पाहिजे. त्या दृष्टीने इलेक्ट्रिक बस हे बेस्टचे क्रांतिकारक पाऊल आहे. माहीम बस डेपोचे आधुनिकीकरण झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना सुविधा मिळेल, त्या व्यतिरिक्त प्रवाशांनादेखील मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. शिस्तबद्ध सेवा ही बेस्टची ख्याती असून, बेस्टच्या कोणत्याही कामामध्ये काही अडचण आल्यास सरकारमार्फत आवश्यक ते सहकार्य केल्याशिवाय राहणार नाही,’ असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
कोरोना उलटणार तर नाही ना हेही पहावे लागणार
‘कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येते आहे. एक-एक गोष्टींवरील निर्बंध आपण सावधगिरी घेऊन शिथिल करतो आहोत. काल हॉटेल्स व रेस्टॉरंटचे मालक भेटून गेले आणि त्यांनी वेळेची शिथिलता द्यावी अशी विनंती केली आहे. रेल्वेच्या प्रवासाबाबत सुद्धा निर्णय घ्यायचा आहे. येत्या काही दिवसांमध्ये त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, परंतु कोरोना उलटणार तर नाही ना हेही पहावे लागणार आहे,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.
Credits and. Copyrights – May Marathi